header ads

जमीन,हवामान,मशागत व लागण

ऊस पिकाच्या लागवडी अगोदर आपण काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देऊया, जेणे करून ऊस उत्पादनात वाढ होईल. या भागात आपण जमीन कशी निवडावी ?  ऊस पिकासाठी कोणतं हवामान उसाच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम करते ? तसेच पूर्वमशागत, उसाची लागण इत्यादी. गोष्टी आपण बघणार आहोत.

नांगरणी | nagarni | plowing
नांगरणी

१) जमीन :-

भारी अथवा मध्यम गाळाच्या व चांगल्या निचऱ्याच्या जमिनी या पिकास योग्य असतात. एक मीटर खोल असलेली भारी जमीन आणि त्याखाली मुरमासारखा पाण्याचा चांगला निचरा होऊ देणाऱ्या पदार्थाचा थर आणि जमिनीचा सामू (जमिनीचा ph ) ६.५ ते ८.५  असेल तर ती जमीन उसासाठी उत्तम असते. 

२) हवामान :-

हवामानातील तापमान,आद्रता, पर्जन्यमान आणि सूर्यप्रकाश या घटकांचा या पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनात परिमाण होत असतो. जास्त थंडी किंवा थंडीच्या लाटीचा उसाच्या वाढीवर परिणाम होतो. लवकर उगवणीसाठी वातावरणातील तापमान १०. डी. सें. पेक्षा कमी नसावे. वाढीच्या अवस्थेत उसाला २५ डी. सें. ते ३५ डी. सें. च्या दरम्यान तापमान, ५० टक्क्यापेक्षा जास्त आद्रता व चांगला सूर्यप्रकाश उपयुक्त ठरतो. 

३) पूर्व मशागत व खत :-

पहिली नांगरट २० -२५ सेमी खोल करावी. पहिल्या नांगरटीनंतर निदान १५ दिवस जमीन तापू द्यावी. नंतर एकरी २० बैलगाड्या शेणखत आणि १५० ते २०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत देऊन नंतर मोठ्या बांधणीच्या वेळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी एकरी १०० ते २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

४) ऊस लागण :-

ऊस पिकाची लागण बाराही महिने असली तरी प्रामुख्याने लागणीचे तीन प्रमुख हंगाम आहेत. 

  • आडसाली हंगाम :- आडसाली उसाची लागवड जुलै - ऑगस्ट महिन्यात केली जाते. हा ऊस १६ ते १८ महिने शेतात राहतो. अलीकडे पाऊसमान निम्मी झाल्यामुळे आणि उसाला वेळ, श्रम, आणि पाणी, निविष्ठा जादा लागत असल्याने आडसाली लागण जवळ जवळ बंद झाली आहे. 

  • पूर्व हंगाम :-  पूर्व हंगाम उसाची लागण सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात केली जाते. हा ऊस १४ ते १५ महिने शेतात राहतो. 

  • सुरु हंगाम :- सुरु हंगामी उसाची लागण डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात केली जाते. हा ऊस १३ ते १४ महिने शेतात राहतो. 

५) बेणे निवड:-  ऊस लागवडीसाठी बेणे निवडताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी. 

  • बेणे जाड, रसरशीत व निरोगी असावे. 
  • डोळ्यांची वाढ चांगली झालेली असावी. 
  • डोळे फुगीर असावेत, ते जुनाट व निस्तेज नसावे. 
  • बेणेसाठी १० ते ११ महिने वयाचा ऊस वापरावा.
  • बेणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे. डोळ्यांजवळ मुळ्या फुटलेला, पांगशा फुटलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये. 
  • बेण्यासाठी खोडवा ऊस वापरू नये. 

६) बेणे प्रक्रिया :-

   उसाचे बेणे जर्मिनेटर १ लि. + १ किलो प्रोटेक्टन्ट + १०० लि. पाणी या द्रावणात ५ ते १० मिनिटे बेणे (कांड्या) भिजत ठेऊन नंतर लागण करावी.

Post a Comment

0 Comments